Saturday, April 8, 2017

सुर्यांश आणि प्राचीन रहस्य- Marathi archaeological adventure novel Part 13

पंकज वळवी | 1:29:00 PM 1 Comment so far

13. कर्नाटकचे गुप्तवचन, प्रो. जॉर्ज आणि लुटारु (1)

पुढच्या काही मिनीटात आणखी काही वस्तु पाहुन झाल्यावर आयेशा पुढे असलेल्या एका हॉलमध्ये शिरली. हॉलच्या दोन्ही बाजुंना तश्याच प्रकारचे काऊंटर होते. डाव्या बाजुवरील पहिल्या काऊंटरवर काचेच्या आवरणात फक्त एका लांब आणि तुटलेल्या हाडाचा तुकडा ठेवलेला होता.

“आता हे काय? हे तर काही बोचकायला वगैरे नाही येत ना?” सॅंडीने आयेशाकडे न पाहता उपहासाने विचारले.

“सॅंडी शांत बस बाळा!” समीरची आई सॅंडीला समजावत म्हणाली. समीरनेही सॅंडीला डिचवले.

“सॉरी!” सॅंडी खाली मान टाकत म्हणाला.

आयेशा मात्र तिचे काम चोखपणे बजावत होती जणु तिला या गोष्टींचा काही फरक पडत नव्हता. ती आपली पुन्हा सुरु पडली.

“हा हाडाचा तुकडा जवळपास 4000 वर्षांपुर्वी लुप्त पावलेल्या एका अज्ञात प्राण्याचा आहे. हाडाचा तुकड्याव्यतिरिक्त आणखी काही अवशेष आढळले नाही म्हणुन हे हाड आता फक्त एक प्रश्न बनुन राहीला आहे.”

“कोठे सापडला होता हा हाडाचा तुकडा?” मि. वसावे म्हणाले.

“रत्नागिरी,” आयेशा उत्तरली.

“वॉव!” समीर उद्गारला.

“हो खरंच अदभुत आहे, कारण 1991 मध्ये रत्नागिरी येथील उत्खननात हे हाड सापडलं आणि शास्रज्ञांनी जेव्हा या हाडापासुन मिळवलेल्या डीएनएचा अभ्यास केला तेव्हा त्यांना दोन प्राण्यांचे संकरीत असे जीन्स आढळले, हे सर्व आश्चर्यचकीत करणारे होते.”

“म्हणजे?” मि. वसावेंना काहीही समजले नव्हते.

“म्हणजे, डीएनए हा शारिरीक रचनेचा मुलभुत घटक असतो व जीन्स हा डीएनएचा मुलभुत घटक असतो. त्यामुळे कोणत्याही प्राण्याचा डीएनए व जीन्स वरुन त्या संबंधीत प्राण्याच्या रचनेबद्दल माहिती मिळु शकते; तुम्ही संकरीत गाई-म्हशींबद्द्ल तर ऐकले असेलच?” आयेशा आता खोलवर जाऊ लागली.

“हो!” मि. वसावे म्हणाले. समीर व सॅंडी ह्यांनी विज्ञानशाखेतुन बारावी केली असल्याने याबद्दल त्यांना माहिती होती. तरी सर्वजण आता कान लावुन ऐकत होते, अगदी सॅंडीही!

“त्यात जसे दोन वेगळ्या जातींच्या गाई अथवा म्हशींपासुन त्यांच्या संकरीत आवृत्ती जन्माला घातल्या जातात, ज्यांचा डीएनए मध्ये दोघाही जातींचे जीन्स असतात म्हणजेच दोघाही जातीचे गुण असतात अगदी तशाचप्रकारे ‘त्या’ प्राण्याच्या हाडात दोन प्राण्यांचे जीन्स आढळले आहेत.”

“पण हे कसं शक्य आहे?” सॅंडीने प्रश्न केला. खरंतर सर्वांचाच मनात हा प्रश्न आला होता.

“हो मान्य आहे की, यावर विश्वास करणं थोडं मुश्किल आहे पण तुम्ही अजुन खरं सत्य तर ऐकलच नाहीये,” आयेशा स्मित करत म्हणाली.

“काय?”

“या हाडात ज्या दोन प्राण्यांचे जीन्स आढळले आहेत, त्यांचा डीएनएत तुसभरही साम्य नाही. म्हणजे आजच्या युगात जरी शास्रज्ञांनी या दोन्ही प्राण्यांचा डीएनए वापरुन पुन्हा एखादा क्लोन बनवायचा प्रयत्न केला; तर ते अगदी अशक्यच आहे.”

“मग हा प्राणी अस्तित्वात आलाच कसा?’’ समीरने प्रश्न उपस्थित केला.

“मी आधीच बोले ना, हे हाड आता फक्त एक प्रश्न बनुन राहीले आहे, ‘वरच्याचीच’ काही करणी असेल ती,” आयेशा समीरकडे पाहुन स्मित करत म्हणाली. एवढ्या वेळात पहिल्यांदाच तिने समीरकडे पाहुन स्मित केले होते. समीर व आयेशा क्षणभर एकमेकांकडेच पाहत राहीले.

“मग कोणत्या दोन प्राण्यांचे जीन्स होते ते?” सॅंडी.

“काही जीन्सचे विंचवाचा जीन्सशी साधर्म्य आहे तर काहींचे गरुडाच्या जीन्सशी,” आयेशा म्हणाली.

सर्वांचे प्रश्न विचारुन झाले व पुढच्या काऊंटरकडे वळले. हळुहळु डावीकडील सर्व काऊंटर पाहुन झाली. आता स्वारी उजव्या बाजुच्या काऊंटरकडे वळली. पहिलेच काऊंटर हे आतापर्यंतच्या काऊंटरपेक्षा थोडे मोठे होते. त्यात अनेक प्राचीन व मध्यमयुगीन लेखं, खलीते होती. नेपोलिअन बोनापार्टचे एक पत्रही होते व दुसर्या महायुद्धातील काही गोष्टी होत्या.

“यातील अनेक लेखं व नकाशे ही देशविदेशातील आहेत. काही लेखं तर 3000 ते 3500 वर्षे जुनी आहेत. त्यावरील काही मजकुरांचा अर्थ समजला आहे तर काहींचा नाही.”

आयेशा पुढे चालत एका मोठ्या कागदी लेखासमोर थांबली, तो लेख काचेचा आवरणात संरक्षित केलेला होता. त्यावर प्राचीन भाषेत काहीतरी मजकुर लिहीलेला होता.

“हा ईसवी पुर्व तिसर्या दशकातील लेख आहे; या लेखाला ‘कर्नाटकचे गुप्तवचन’ असे म्हणतात, कारण हा कर्नाटकमध्ये सापडला होता. यावरील मजकुरानुसार, हा एका लपविलेल्या खजिन्यापर्यंत पोहोचण्याचा मार्गाचा एकमेव पुरावा आहे, खजिन्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग हा एका कोड्याच्या रुपात लिहीलेला आहे, पण ते कोडे आजपर्यंत कोणालाही समजलं नाहीये,” आयेशा रहस्यमयरित्या बोलत होती.

“काय आहे ते कोडे?” समीर हळुच म्हणाला.

“कोडे मी सांगते पाहा जमतंय का!” आयेशाने कोडे सांगायला सुरुवात केली.

“जमीन आणि आकाशादरम्यान होता एक खजिना. ज्यात होते सोने, चांदी आणि नाणी. शोधेल जो त्या खजिन्याचा मालकाचे नाव आणि दोन गाळलेले शब्द, ठरेल खजिन्यासह जगाचाही मालक तोच!”

“करा! करा! विचार करा!” सांगुन झाल्यावर आयेशा स्मित करीत सर्वांवर नजर फिरवु लागली. सगळेजण विचार करु लागले, पण कोडे सोडवणे तर दुर कोणाला कोड्याचा अर्थ देखील समजला नव्हता. सर्वजण एकमेकांकडे प्रश्नार्थक नजरेने पाहु लागले. हे कोडं कोणीही सोडवु शकणार नाही हे आयेशाला ठाऊक होते कारण तिला माहीत होते की, खुद्द प्रो. जॉर्जसुद्धा हे कोडं सोडवु शकले नव्हते!

“हे सार थोताडं दिसतयं. काय जमीन, काय आकाश अन कसला खजिना; असचं कोणीतरी मस्करी करायला मागे सोडुन गेला असणार हा फाटका कागद, लोकांना भरकटवायला,” सॅंडी उपहास करीत म्हणाला.

“एक्सक्युज मी! हे काही थोताडं नाहीये, जर कोडे कळत नसेल तर तो स्वत:चाच कमीपणा आहे हे मान्य करावे, आणि तुझ्या माहीतीसाठी सांगते, प्रो. जॉर्जचा मृत्युचे कारण ‘कर्नाटकचा गुप्तवचना’लाच मानले जाते, म्हणुन ह्या फाटक्या कागदाच्या खरेपणावर तु शंका घेऊ नकोस हेच चांगल होईल तुझ्यासाठी,” आयेशाने सॅंडीला फटकारले. आयेशा व सॅंडी एकमेकाकडे रागात पाहु लागले.

“सॉरी! मी सॉरी म्हणतो याच्याकडुन,” समीर परिस्थिती हाताळत म्हणाला. आतापर्यंत नम्र असलेल्या आयेशाचे तो सडेतोडपणा पाहुन तोही भांबावला होता. सॅंडीही चिडला होता पण तो काही बोलायच्या आतच समीरने त्याला शांत केले होते.


“ईट्स ओके!” आयेशाही समीरच्या मध्यस्थीमुळे शांत झाली. मि. वसावेंनी सॅंडीची पाठ थोपाटत त्याची समजुत काढुन त्याला शांत केले. समीरला आता सॅंडीच्या अश्या चिडचिडपणाचं नवल वाटायला लागलं होतं, कारण शाळेत नेहमी हसमुख राहणार्या सॅंडीला असं एवढं कोणावर चिडचिड करताना त्याने कधी पाहीलं नव्हतं.

क्रमश:

Part 12 Part 14Marathi story, marathi novel, marathi kadamabari, marathi katha

1 comment:

तुमच्या प्रतिक्रिया कळवा...

Keep commenting... Keep supporting...

नवीन पोस्ट मिळविण्यासाठी ईमेल सबस्क्राईब करा!